anna पद्मभूषण क्रांतिवीर
डॉ.नागनाथअण्णा नायकवडी Padmabhushan Krantiveer Dr. Nagnathanna Nayakawadi

Anna

आता उठवू सारे रान
आता पेठवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी
लावु पणाला प्राण ।
हि साने गुरुजींची अपेक्षा आपल्या कार्यातून सत्यात उतरविणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा. देशाला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लहान वयातच अण्णानी स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले. १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण या स्वातंत्र्याने अण्णा समाधानी नव्हते, हे स्वातंत्र्य भांडवलदार, उद्योगपती,जमीनदारांचे आहे , ते कष्टकरी जनतेच्या हिताचे नाही. त्यामुळेच त्यांनी शेतमजूर , कष्टकरी शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या खर्‍या खुर्‍या स्वातंत्र्यासाठी आणखी अनेक सामाजिक लढे सुरु केले. स्वातंत्र्य लढ्यात अण्णा हातात बंदुक घेवुनच ब्रिटीशांनाविरुध्द लढले. स्वातंत्र्यानंतर ते चळवळीच्या रुपाने भांडवलदार, प्रस्थापित आणि सरकारविरुघ्द लढत राहीले. धरणग्रस्तांचे प्रश्न असोत, दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळवून देण्याची चळवळ असो, बहुजन समाजातील विविध घटकांच्या समस्या संघटीतपणे सोडविण्यासाठी पाठबळ द्यावयाचे असो, सहकारी साखर कारखानदारीतील विविघ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावी लागणारी संघटणात्मक चळवळ असो, प्रत्येक ठिकाणी अण्णांनी आपल्या धडाडीने व गतीशीलतेने सकारात्मक बदल घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला.